शिशु आहार
बाळाचा आहार हा प्रत्येक मातेचा जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. आपल्या बाळानी भरपूर आणि पौष्टीक खावे, दूध प्यावे असे तिला कायम वाटते. आईच्या दुधाचं महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. स्तनपान बाळासाठी आणि आईसाठी किती महत्वाचे आहे हे जाणून घेऊन या . बाळाचा जन्म झाल्यावर लवकरात लवकर मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. प्रयोगांती हे सिध्द झाले आहे की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर त्याच्या आईच्या पोटावर आडवे झोपवले तर बाळ स्वत:हून आईच्या स्तनाकडे सरकते व स्तनपान करते ह्याला ‘ब्रेस्ट क्रॉल’ म्हणतात. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला एका तासातच स्तनपान चालू करावे, त्याला त्याच्या आईचे हवे तेवढे दूध पिऊ द्यावे. जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान करविल्याने आईला जास्त दूध येण्याची क्रिया चालू होते. त्यामुळे आईचे गर्भाशय आकुंचन पावते व जोराचा रक्तस्त्राव किंवा रोगसंसर्ग होण्याचा धोका कमी होते. बाळाच्या जन्मानंतरच्या काही दिवसांमध्ये आईच्या स्तनांमधून पिवळसर रंगाचे घट्ट दूध येते....