शिशु आहार




बाळाचा आहार हा प्रत्येक मातेचा जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. आपल्या बाळानी भरपूर आणि पौष्टीक खावे, दूध प्यावे असे तिला कायम वाटते.आईच्या दुधाचं महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. स्तनपान बाळासाठी आणि आईसाठी किती महत्वाचे आहे हे जाणून घेऊन या . 

बाळाचा जन्म झाल्यावर लवकरात लवकर मातेने बाळाला स्तनपान दिले पाहिजे. प्रयोगांती हे सिध्द झाले आहे की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जर त्याच्या आईच्या पोटावर आडवे झोपवले तर बाळ स्वत:हून आईच्या स्तनाकडे सरकते व स्तनपान करते ह्याला ‘ब्रेस्ट क्रॉल’ म्हणतात.नुकत्याच जन्मलेल्या बाळाला एका तासातच स्तनपान चालू करावे, त्याला त्याच्या आईचे हवे तेवढे दूध पिऊ द्यावे. जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान करविल्याने आईला जास्त दूध येण्याची क्रिया चालू होते. त्यामुळे आईचे गर्भाशय आकुंचन पावते व जोराचा रक्तस्त्राव किंवा रोगसंसर्ग होण्याचा धोका कमी होते. बाळाच्या जन्मानंतरच्या काही दिवसांमध्ये आईच्या स्तनांमधून पिवळसर रंगाचे घट्ट दूध येते. त्यास कोलोस्ट्रम म्हणतात. ते अतिशय पोषक असते व बाळाचे जंतुसंसर्गांपासून रक्षण करते. काही वेळा मातांना हे दूध बाळास न पाजण्याचा सल्ला दिला जातो, मात्र हा सल्ला चुकीचा आहे. 

आईचे दूध म्हणजे बाळाचे ‘पहिले लसीकरण’ समजावे. कारण आईच्या दुधामुळे बाळाचे अतिसार (डायरिया), छाती व कानाची दुखणी व अशाच इतर गंभीर आजारांपासून आपोआपच संरक्षण होते. सर्वच बाळांना पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देण्‍यात आले तर तरी दरवर्षी होणारे सुमारे 1.5 दशलक्ष बालमृत्यू टळतीलच शिवाय  बालकांचे आरोग्य सुधारून त्यांचा चांगल्या रीतीने विकास होईल. पहिले सहा महिने बाळ फक्त आईच्या दुधावरच असल्यास आणि मूल दोन वर्षांचे होईपर्यंत व पुढे ही स्‍तनपान चालू ठेवल्‍यास हे संरक्षण अधिकच भक्कम बनते. कोणतेही इतर पेय किंवा आहार ह्या दर्जाचे संरक्षण देऊ शकत नाही. आईचे दूध पिणारी मुले कमी प्रमाणात आजारी पडतात तसेच इतर प्रकारचे अन्न खाणार्‍या मुलांच्या तुलनेमध्ये त्यांना अधिक चांगले पोषण मिळते..

 आईच्या दुधाला पर्याय म्हणून इतर प्राण्यांचे दूध बालकांना देण्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जवळजवळ सर्वच माता आपल्या मुलास यशस्वीपणे स्वतःचे दूध पाजू शकतात. ज्या मातांना असा आत्मविश्वास नसेल त्यांना बालकाच्या पित्याने, कुटुंबियांनी तसेच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मदत केली पाहिजे व प्रोत्साहन दिले पाहिजे. जन्मापासूनच बाळाला त्याच्या इच्छेनुसार दूध मिळाले पाहिजे. स्तनपानानंतर बाळ 3 तासांपेक्षा जास्त काळ झोपले असेल तर त्यास हळुवारपणे उठवून स्तन तोंडात देण्याचा प्रयत्न करा.रडणे हे बाळाला इतर पेये किंवा खाण्‍याची गरज आहे ह्याचे लक्षण नाही. सामान्यपणे याचा अर्थ असा की बाळाला जवळ घेऊन कुरवाळण्‍याची गरज आहे. काही बाळांना दूध पिण्यानेच बरे वाटते. बाळ जितके जास्त दूध पिईल तितके अधिक दूध निर्माण होते. काही मातांना स्वतःला पुरेसे दूध येणार नाही अशी भीती असते व त्यामुळे त्या बरेचदा बाळाला, सुरुवातीच्या काही महिन्यांमधेच, वरचे अन्नपाणी चालू करतात. परंतु ह्यामुळे बाळ स्तनपान कमी करते, परिणामी आईला कमी दूध येते. बाळाला इतर पेये किंवा आहार न देता अधिक स्तनपान करविल्यानेच आईला जास्त दूध येईल. अंगावर पिणार्‍या मुलांना एरवीच्या वेळी चोखण्यासाठी बाटली किंवा निपल देऊ नका कारण अशा वस्‍तू चोखण्याची बाळाची क्रिया दूध प्‍यायच्‍या वेळी चोखण्यापेक्षा वेगळी असते. ह्यामुळे बाळाचे अंगावर पिणे कमी होते आणि आईला येणार्‍या दुधाचे प्रमाण कमी होते व बाळाचे स्‍तनपानाचे प्रमाण कमी होऊन थांबू ही शकते. 

    स्तनपानामधून आई व मुलामध्ये विशेष नाते घडविले जातेबाटलीने दूध पिणार्‍या मुलाच्या तुलनेमध्ये अंगावर पिणार्‍या बाळाला आईचे लक्ष आणि वात्सल्य साहजिकच अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे बाळास अधिक सुरक्षित वाटते आणि त्याची वाढ व विकास चांगल्या रीतीने होण्यास मदत होते. मुलांना सहाव्या महिन्यानंतर जास्तीचे अन्न लागत असले तरी आईचे दूध हा त्यांच्यासाठी शक्तीचा मोठा स्रोत असतो. त्यामध्ये अ जीवनसत्व, लोह आणि प्रथिनेदेखील भरपूर असतात. बाळाचे स्तनपान चालू असेपर्यंत त्याला आईच्या दुधाद्वारे रोगांपासून संरक्षण मिळते. सहा महिने ते एक वर्ष ह्या काळात इतर अन्नपाणी देण्याच्या आधी बाळास आईचे दूध द्यावे म्हणजे दर रोज आईचे भरपूर दूध बाळाच्या पोटात खात्रीने जाईल. दुसर्‍या वर्षी मुलास जेवणानंतर व इतर वेळी आईचे दूध द्यावे. आई मुलाला, परस्परसंमतीने, किती ही काळापर्यंत स्तनपान करवू शकते. बाळाला दूध पाजल्याने मातेचे बाळंतपणानंतर गर्भाशय पूर्वस्थितीला लवकर येते, गरोदरपणात वाढलेले मातेचे वजन कमी होते, मातेच्या हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते, स्तनाच्या कर्करोगापासून तिला संरक्षण मिळते. 


'बाळगुटी' हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले शतशः सिद्ध असे एक लेहन आहे. पन्नासव्या दिवसापासून बाळाला गुटी द्यायला सुरुवात करावी. याने बाळाचे पचन चांगले राहते. पोट रोज आणि नियमितपणे साफ व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने सर्दी, खोकला, तापासारखे छोटे-छोटे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. शरीराचे पोषण झाल्याने वजन वाढायला व एकंदर विकास व्हायलाही मदत मिळते. बाळगुटी मधील द्रव्य आईच्या दुधात उगाळून देणे सर्वात चांगले अन्यथा वर उल्लेखलेल्या सुवर्णसिद्धजलात ती उगाळावीत. ही द्रव्ये अखंड असावीत. आणि उगाळून झाल्यावर नीट पुसून कोरडी करून हवाबंद डब्यात ठेवावीत. बाळगुटी पहिले आठ महिने द्यावी. मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष सव्वा वर्ष पर्यंत गुटी देणे बाळाच्या एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय. बाळगुटीमध्ये पचन सुधारणारी, मेंदूची ताकद वाढविणारी, जंताची प्रवृत्ती कमी करणारी, हाडांना बळकट करणारी अशी विविध प्रकारची द्रव्ये असतात. 

संपूर्ण बाल्यावस्थेत  बाळाच्या आहारामध्ये शिजवून कुस्‍करलेला भाजीपाला, धान्‍ये, डाळी व फळे, थोडेफार तेल, तसेच अंडी, मासे, मांस व दुधाच्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे ज्यायोगे त्यास सर्व प्रकारची जीवनसत्वे व खनिजे मिळतील. वयाच्या ५-६ व्या महिन्यापासूनच चिरडलेले केळे, आंबा, पपई, चिकू, सफरचंद, इ. फळे आणि तांदूळ, गहू, नाचणी इ. शिजविलेले अन्न पदार्थ वा रव्याची पेज, खिचडी इ. स्तनपानाबरोबरच देण्यासाठी सुरवात करावी. बाजारात मिळणारे डबाबंद फॅरेक्स, नेस्टम इ. तयार अन्नपदार्थ शक्यतो टाळावे. तांदूळ, गहू, नाचणी व मूग डाळ समभाग घेऊन तव्यावर परतून भरड पावडर तयार करावी व हवाबंद डब्यात बंद करून ठेवावी. ह्या भरड पावडरीत दूध, साखर, मीठ घालून चांगला सांजा करता येईल व बाळाला तो आवडेलही. ह्याच वेळी बाळाला उकळून थंड केलेले पाणी कप वा लहान ग्लासने पाजण्यास सुरवात करा. कुठल्याही वयात बाटली नको.

एक वर्षापासून फळे, हिरवी-पिवळी पालेभाजी, मोड आलेले कडधान्य, तांदूळ, कोंडायुक्त गव्हाचे पीठ असलेला नेहमीचा आहार बाळास सुरू करावा. साधारण बालके एका वेळी जास्त खाऊ शकत नाहीत, त्यांना दर २-३ तासांनी भरवावे. 


दोन वर्षानंतर मुलाला दिवसा वरण, भात, तूप, भाजी, पोळी, कोशिंबीर, ताक असे संपूर्ण जेवण द्यावे अशा प्रकारचे संपूर्ण जेवण जेवण्याची सवय लहान वयात लावली तरच मूल सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, आमटी वगैरे पदार्थ खायला शिकतात. अगदी लहान वयात हे नको, ते नको, अशा आवडीनिवडी निर्माण झालेल्या नसतात. तसेच या वयात थोड्याफार प्रमाणात आवडीनिवडी बदलता येणे शक्य असते. म्हणून मुलाच्या भविष्याचा व आरोग्याचा विचार समोर ठेवून मूल सर्व प्रकारचे जेवण जेवेल आणि जेवणात आलटून पालटून सगळ्या भाज्यांचा समावेश होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.





Comments

Popular posts from this blog

सुप्रजनन आणि गर्भसंस्कार काळाची गरज

Sex Dertermination

गर्भसंगीत आणि गर्भवती