गर्भाची ज्ञानेंद्रिये आणि ज्ञान ग्रहण क्षमता
तुमच्या बाळाचे जन्म होण्यापूर्वीचे विश्व कसे असते याची माहिती आपण पुढे घेणार आहोत.
गर्भधारणेनंतर वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती होते, त्याचा विकास होऊ लागतो आणि त्यांचे कार्य सुरू होते. गर्भधारणेनंतर बाविसाव्या दिवशी नेहमीसारखे हृदय तयार झालेले नसते,फक्त दोन नळ्या असतात आणि त्या जोडल्या जाऊन त्यातून रक्तप्रवाह सुरू होतो. या एकाच गोष्टीवरून मानवी गर्भाची वाढ कशी वेगळ्या तऱ्हेने होते हे दिसून येते. एरवी कुठलीही गोष्ट किंवा वस्तूचे सगळे भाग जोडले गेल्याशिवाय ती चालू होत नाही. पण माणसाच्या निर्मितीचे असे नाही. जो भाग ज्या स्वरूपात सुरवातीला असतो त्याच स्वरूपात त्याचे कार्य सुरू होते, नंतर तो भाग संपूर्ण प्रगत अशा स्वरूपात यथावकाश तयार होतो. गर्भाची वाढ व विकास होताना हा वैशिष्ट्यपूर्ण फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी सुसंवाद होण्यासाठी ते ते इंद्रिय पूर्ण विकसित होण्याची गरज नसते.
'गर्भावस्थेत मुलाला कळते' याबाबत आता नवनवीन पुरावे हाती येऊ लागले आहेत. गर्भधारणेपासून पहिल्या काही महिन्याच्या काळामध्ये ज्ञानेंद्रिये कशी विकसित होतात ती ज्ञानग्रहण कसे करतात याबद्दलच्या संशोधनात रोज नवीन भर पडत आहे.
1) स्पर्श: - जन्मपूर्व अवस्थेत सातव्या महिन्यात गर्भामध्ये अनेक जाणिवा निर्माण झालेल्या असतात, असे आतापर्यंत समजले जात होते. पण आता नवीन संशोधनामुळे ही सात महिन्याची मर्यादा काही आठवड्यापर्यंत एवढी अलीकडे आली आहे. चार आठवड्याच्या गर्भाला एका केसाचा सुद्धा स्पर्श कळू शकतो. स्पर्शाची जाणीव ही गर्भाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हळू हळू विकसित होते. उदा. ८व्या आठवड्यात गाल, ११व्या आठवड्यात हातांचे तळवे, १७व्या आठवड्यात आेठ आणि ३२व्या आठवड्यामध्ये गर्भाच्या संपूर्ण शरीराला स्पर्शाची जाणीव होऊ शकते.
2) चव:- संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे गर्भाला चव कळू शकते व त्याची सुरुवात केवळ १४व्या आठवड्यापासून होते. सामान्यपणे माणसाला गोड जास्त आवडते आणि नूतन जन्मणारा गर्भ सुद्धा याला अपवाद नाही. गर्भ हा गर्भजल (amniotic fluid) तोंडावाटे घेत असतो. त्याला गोड चव लागली असता तो ते अधिक प्रमाणात पितो, तर कडू व तुरट चव असतांना ही पिण्याची क्रिया मंदावते, असे दिसून आले आहे. म्हणजेच गर्भाची चवीची निवड क्रिया, त्याबद्दलचे त्याचे मत हे १४व्या आठवड्यापासून तयार होते.
3) वास (गंध):- गर्भाला गंधज्ञान असते अशी कल्पना करणेसुद्धा आश्चर्यकारक ठरते, कारण वास कळण्याची क्रिया आपल्या समजुतीप्रमाणे मुख्यतः हवा व श्वास आत घेणे याच्याशी निगडित असते. तथापि शास्त्रज्ञांनी या बाबतीतही वेगळे संशोधन प्रसिद्ध केले आहे. गंध कळण्याची प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नसून ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे लक्षात आले आहे. जन्मपूर्व अवस्थेमध्ये ११ ते १५ आठवड्यामध्ये वास समजण्याचे इंद्रिय म्हणजे नाक तयार होते. गर्भ ज्यामध्ये वाढतो त्या गर्भजलामध्ये वास व चव असणारी अनेक रसायने असतात. गर्भ जेव्हा गर्भजल गिळतो त्यावेळेस ते नाकातून सुद्धा आतमध्ये घेतले जाते. त्यामुळे नाकात असणारे वासाचे संवेदक उद्दीपित होतात व गर्भाला वास सुद्धा कळू शकतो. गर्भाला आईच्या मार्फत अन्नपुरवठा होत असल्यामुळे आईच्या खाण्याचा परिणाम सुद्धा गर्भजलावर व पर्यायाने गर्भावर होतो. १९९५ साली याबाबतचे संशोधन शाल व रेगन यांनी केले.
4) दृष्टी:- जन्मपूर्व अवस्थेमध्ये दृष्टी कशी असते याबाबत जास्त संशोधन शास्त्रज्ञांना करता आलेले नाही. तथापि पूर्ण विकसित झालेल्या गर्भाच्या दृष्टीमध्ये ज्ञान करून घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी असतात. डोळे २७व्या आठवड्यापर्यंत बंद असतात. मात्र प्रकाशाला प्रतिसाद देण्याची क्षमता गर्भात असते. गर्भजल परीक्षेबाबतच्या एका वेगळ्या प्रयोगाचा निष्कर्ष म्हणून शास्त्रज्ञांना असे लक्षात आले की, गर्भावस्थेमध्ये गर्भाचे डोळे बंद असतानासुद्धा बघण्याची एक विलक्षण शक्तीही गर्भाजवळ असते. त्याचप्रमाणे गर्भावस्थेत वाढणार्या जुळ्या मुलांवरील प्रयोगात त्यांना असे लक्षात आले की, २०व्या आठवड्यामध्ये दृष्टीशिवायही ती एकमेकांना स्पर्श करू शकतात.
5) गर्भजल परीक्षा - गर्भजल परीक्षा (amniocentesis) ही अनेक कारणांसाठी केली जाते. या परीक्षेमुळे वाढणाऱ्या गर्भामध्ये सुमारे ६४ प्रकारचे दोष आहेत का, याचे परीक्षण होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच वेळेला डॉक्टर सदरची परीक्षा करून घेण्याचा सल्ला देतात. या परीक्षेचा उपयोग आणखी एका कारणासाठी केला जातो. ते म्हणजे येणारा जीव हा मुलगा आहे की मुलगी ते पाहण्यासाठी. बऱ्याच वेळा मुलगी असेल तर ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. गर्भजल परीक्षेमध्ये गर्भ ज्या पाण्यामध्ये वाढत असतो, त्याचा एक नमुना इंजेक्शनची सुई टोचून काढून घेतला जातो. गर्भाच्या भोवती असणारे हे पाणी एक संरक्षक कवच म्हणून काम करते. गर्भजल परीक्षेमुळे या कवचाला धोका पोहोचू शकतो. या क्षेत्रामध्ये प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे लक्षात आले की, गर्भजल परीक्षेसाठी जेव्हा इंजेक्शनची सुई टोचली जाते त्यावेळेला गर्भाचा उद्रेक होतो व गर्भ सुई पासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसर्या बाजूला आक्रसून घेतो. या सर्व प्रक्रियेत गर्भाच्या ह्रदयगतीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होतो आणि तो पूर्वपदावर येण्यासाठी काही दिवस सुद्धा लागू शकतात.
येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, सर्वसाधारणपणे गर्भजल परीक्षा ही सोळाव्या आठवड्याच्या सुमारास केली जाते. त्यावेळेला गर्भाची ज्ञान ग्रहण करण्याची कुठलीच इंद्रिये विकसित झालेली नसतात. उदा. कान, नाक, डोळे, मेंदू इत्यादी मग गर्भाला कसे करू शकते? स्वसंरक्षण करण्याचे ज्ञान त्याला कोठून येते?
6) आवाज (ध्वनि):- गर्भाला हृदयाचा आवाज ,पोटामधल्या वायूंचा आवाज, श्वासाचा आवाज असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येत असतात त्यामुळे आवाजाच्या दुनियेत राहत असलेला हा गर्भ आवाजाला प्रतिसाद न देईलच तर नवल. तो आवाजiला इतका संवेदनशील असतो की केवळ पाच सेकंदाच्या आवाजाच्या उद्दीपनामुळे त्याच्या छातीचे ठोके व हालचालीत फरक पडतो व तासभरापर्यंत तो टिकू शकतो.
जपानमधील संशोधकांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. विमानतळ हे विमानांच्या येण्या जाण्याने गजबजलेले असतात. साहजिक विमानांच्या उड्डाणामुळे बाजूच्या वातावरणातील ध्वनिप्रदूषणाची पातळी खूप वाढलेली असते. अशा हया परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलांचा जपानी संशोधकांनी अभ्यास केला. त्यात त्यांना असे दिसून आले की, ध्वनिप्रदूषणामुळे अपुऱ्या दिवसांची प्रसूती (premature) होण्याचे प्रमाण वाढले तसेच ती मुलेसुद्धा शरीराने लहान जन्माला आली.
गर्भाने आवाजाला प्रतिसाद देण्याची क्रिया किंवा प्रतिसादपूर्वक ऐकणे ही प्रक्रिया गर्भधारणेपासून सोळाव्या आठवड्यातच सुरू होते. शाहिदुल्ला आणि हेप्पर या शास्त्रज्ञांनी ४०० गर्भावर २५० ते ५०० हर्टझ या कंपनसंख्येचा आवाज सोडून हा निष्कर्ष काढला आहे.
आधिक माहिती करता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/WhY11lO9gg4
Comments
Post a Comment