जन्मपूर्व संस्कार - जागतिक प्रयत्नांचा आढावा

 


भारतामध्ये जन्मपूर्व संस्काराचा बराच मोठा इतिहास आहे. अभिमन्यूच्या उदाहरणाने तो महाभारत काळापर्यंत मागे गेलेला आहे. सध्याच्या विज्ञानयुगात एकविसाव्या शतकात मागोवा घेतांना असे दिसते की, जेथून सुरुवात झाली त्या भारतात त्या मानाने जन्मपूर्व संस्काराबद्दल कमी जाणीव आहे, तर जगात इतरत्र मात्र याबाबतीत बराच शास्त्रशुद्ध प्रयत्न करण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रयत्न कोणी कुठे केला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.
       जन्मपूर्व अवस्थेत गर्भाला कळू शकते अशा प्रकारच्या विधानाला पुष्टी देणारे वैज्ञानिक संदर्भ (पेपर्स) काही प्रमाणात माहिती (डाटा) प्रयोग हे १९४० पासून अधूनमधून प्रसिद्ध होत होते .
   असोसिएशन फाॅर प्रि अँड पेरिनॅटल सायकॉलॉजी अँड हेल्थ:- जन्मपूर्व जन्म उत्तर अवस्थेमधील शारीरिक वाढ मानसशास्त्र याबद्दल संशोधन करणारी ही एक महत्वाची संस्था १९८३ साली कॅनडा येथे स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक डॉ. थॉमस आर वेनीॆ (एम डी) हे आहेत. सदरच्या संस्थेमध्ये 'जन्मपूर्व अवस्थेमध्ये सुद्धा गर्भाला मानसिक आयुष्य असते' ही कल्पना मान्य असणाऱ्या कोणालाही प्रवेश आहे. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, मानसशास्त्रज्ञ, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक . सर्वांचा समावेश आहे. १९८३ पासून दर दोन वर्षांनी जगामधल्या वेगवेगळ्या प्रमुख शहरात यांचे अधिवेशन भरते त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था या विषयासंबंधी जाणीव निर्माण करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण होते.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ  प्रि अँड पेरिनॅटल सायकॉलॉजी अँड मेडिसिन - १९७१ साली जर्मनीत संस्था स्थापन झाली. तिचे कार्यक्षेत्र मुख्यतः युरोप मध्ये आहे. या संस्थेचे जागतिक अधिवेशन दर वर्षांनी असते.
'वर्ल्ड ऑर्गनायझेशन अँड असोसिएशन फॅार प्रिनॅटल एज्युकेशन अँड लाइफ.
युनिव्हर्सिटी ऑफ साल्झबर्ग, ऑस्ट्रीया:- ऑस्ट्रेलियातील साल्झबर्ग विद्यापीठातील डॉ. गेरहर्ड राॅटमन यांनी १४१ गर्भवती महिलांचा अभ्यास केला, त्यामध्ये त्यांना असे आढळून आले की, आईच्या वृत्तीचा मुलावर महत्वपूर्ण परिणाम घडतो. आपले पोटातील मुल चांगले व्हावे, असे वाटणाऱ्या आदर्श मातांचे बाळंतपण सहज होते. त्यांची मुलेही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ बनतात. निराशावादी मातांना मुलाच्या जन्मवेळी खूप त्रास होतो. अशा मुलांचा जन्मही नऊ महिन्यांच्या आधीच होतो. ती मुले कमी वजनाची आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात.
          थायलंड येथील डॉ. चैैैैरट पन्थूरामफॉजॆ यांनी जन्मपूर्व अवस्थेतील मुलांवर प्रयोग केले. सदरच्या प्रयोगात पालकांचा गर्भातील बालकाशी वेगवेगळ्या  ज्ञानेंद्रियांमार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना असे लक्षात आले की, ही मुले जन्मानंतर आई वडिलांशी अधिक जवळ असतात त्यांना लवकर बोलता येते, ती लवकर हसू शकतात. या संदर्भात डॉक्टरांनी दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत
        व्हेनेझुएला येथील मानसोपचारतज्ञ डॉक्टर बिएट्रीज मॅनरिक यांनी याविषयी केलेले संशोधन फार महत्वाचे आहे. वैज्ञानिक प्रयोगांच्या आवश्यकतांची पूर्ती करणारा जास्तीत जास्त लोकांवर केलेला हा संशोधन प्रयोग आहे. एकूण ६८० जोडप्यांवर हा प्रयोग केला गेला. या ६८० लोकांचे वर्गीकरण 'नियंत्रित गट' आणि 'प्रायोगिक गट' यामध्ये केले गेले. त्यामध्ये गर्भावस्थेत गर्भाला दिलेल्या शिक्षणाचा परिणाम हा जीवशास्त्रीय, मानसशास्त्रिय समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा होतो हे तपासले गेले. जन्मपूर्व अवस्थेत दिलेल्या शिक्षणाचा परिणाम पुढे जन्मानंतर सहा वर्षे वयापर्यंत नोंदवला गेला. त्यामध्ये असा निष्कर्ष आला की, जन्मापूर्व अवस्थेतल्या शिक्षणामुळे मुलांमध्ये भाषा , स्मरणशक्ती , निरीक्षणशक्ती , बोलण्याची शक्ती नियंत्रण शक्ती या सातत्याने उच्च प्रतीच्या आढळल्या. त्याशिवाय गर्भवती माता सुद्धा अधिक धैर्याने प्रसूतीला सामोर्या गेल्या. वडिलांचा मुलांबरोबर कुटुंबाबरोबर एक चांगल्या प्रकारचा बंध निर्माण होऊन एकंदरच कुटुंबामध्ये एकसंधपणा दिसून आला. या सर्व गोष्टींमुळे व्हेनेझुएला येथील प्रशासन आता सरकारी पातळीवर हा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
       जन्म घेण्याची किंवा जन्म होण्याची प्रक्रिया एका तऱ्हेने गुंतागुंतीची असते. ही सर्व प्रक्रिया कोणाच्या नियंत्रणाखाली असते? याचे सूत्रसंचालन कोण करते? जन्माला येणारा जीव करतो? की त्याचे पालन पोषण करणारे त्याची माता करते. हा अगदी पुरातन काळापासून पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर जरी मिळाले नसले तरी शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की, जन्माच्या प्रक्रियेमध्ये गर्भ किंवा येणारा जीव याची नुसती बघ्याची भूमिका नसते. त्याउलट येणारा जीव हा या सर्व प्रक्रियेमध्ये हिरीरीने सहभाग घेतो. त्यामुळे जन्माच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे लागेल. 'अमेरिकन सायंटिस्ट' या मासिकाच्या नोव्हें / डिसें १९९६ च्या अंकात डाॅ. पीटर डब्ल्यू. नॅथनिल्झ यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. नॅथनिल्झ हे गर्भधारणा प्रसूती विषयी संशोधन करणाऱ्या 'कॉरनेल लॅबोरेटरी' चे संचालक आहेत. 'लाईफ बिफोर बर्थ' या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जन्माला येण्याची वेळ ही सुद्धा जन्माला येणारा गर्भच ठरवीत असतो. गर्भाची वाढ पूर्ण झाल्यानंतर तो तसा संदेश 'हार्मोन्स' द्वारा आईला पाठवतो. हा संदेश गर्भाच्या मेंदूकडून पाठवला जातो त्यानंतर मातेला प्रसूतीवेदना होण्यास सुरुवात होते. आपण केव्हा कोणत्या वेळी जन्माला यायचे हे जर गर्भ ठरवत असेल तर आत्तापर्यंत आपण मानत आलेल्या सर्वच गोष्टींचे पूनॆमूल्यांकन करावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

सुप्रजनन आणि गर्भसंस्कार काळाची गरज

Sex Dertermination

गर्भसंगीत आणि गर्भवती