गर्भवतीसाठी पोषक आहार
गर्भारपणातील आहाराबाबत मार्गदर्शन करतांना आर्युवेदशास्त्र कसलाही अतिरेक न करण्याचा सल्ला देते. गोड आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या षडरसांनी युक्त आहार असावा हे खरे. गर्भारपण हा गर्भवतीचा कोडकौतुकाचा काळ आहे हे खरे या काळात स्त्री आपले आवडते पदार्थ खाण्यावर भर देते. मात्र हे पदार्थ एक दोनच असतील तर तेच ते पदार्थ खाण्याने लाभापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त. शिवाय या काळात पदार्थ आवडीचे असण्याइतकेच ते षडरसपूणॆ, स्वतःसाठी आणि गर्भातल्या बाळासाठी पोषक असणे आवश्यक असते. आहारातील पदार्थ, वेळा, त्यांचे पोषणमूल्य यांची लिखीत नियमावली आपल्या पूर्वजांनी अनुभवाने लिहूनच ठेवली आहे. तिचे अनुकरण करणे बाळासाठी चांगले आहेच, त्याबरोबरच स्वतःसाठी उपयुक्त आहे. बाळंतपणानंतरचे आजार, केस गळणे, शरीर बेढब होणे, कंबर सुटणे, काळवंडणे आदी प्रकार त्यामुळे टाळता येतात. थोडक्यात आवडते किंवा खावेसे वाटते म्हणून कुठल्यातरी एकाच चवीचा अतिरेक न करता आहार संतुलित आणि प्रकृतीला अनुकूल असा ठेवावा.
गर्भिणीने गरोदर अवस्थेत स्वतःच्या पोषणाबरोबरच गर्भाचे योग्य पोषण होण्यासाठी, स्वत:चे बल टिकून राहण्यासाठी व रसधातूचा उपधातु स्तन्य निर्माण होण्याच्या दृष्टीने नऊ महिने गर्भिणीने ताजे, सकस, मनाला आवडणारे, सात्म्य म्हणजे आपल्या सवयीचे गोड, स्निग्ध आणि त्यात भूक वाढवणारी सुठ, आले, पुदीना, मिरी ही द्रव्ये घालून तयार केलेले पदार्थ सेवन करावे; तसेच रसधातू परिपोषक असा द्रव व मधुर आहार विशेषत्वाने सेवन करावा.
आहार योजना जरी व्यवस्थित केलेली असली तरी आहार घेण्याची पद्धत ही योग्य असणे आवश्यक असते. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' हे आपल्या सर्वांना माहित आहे. अन्न फक्त पोट भरण्यासाठी खायचे नसते. तर ते जठराग्नीला 'हवन' या जाणिवेने पाविञ व श्रद्धापूर्वक करायला हवे. जेवण व न्याहारीच्या वेळा सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये पाचक रस स्ञवण्याचा एक ठराविक व नियमित असा क्रम असतो आणि खाण्याच्या वेळा या क्रमानुसार ठेवणे आवश्यक असते. पाचनशक्ती प्रदीप्त असताना घेतलेला आहार पचण्यास सोपा जातो व त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त राहण्यासाठी मदत मिळते. म्हणून जेवणाच्या वेळात फार फेरफार करू नये. गर्भारपणात इतर सर्व गोष्टी प्रमाणे पचनही संवेदनशील आणि नाजूक झालेले असते. एखाद्या दिवशी जेवायची वेळ झाली असताना आता भूक नाही, जरा उशिरा जेवावे असे वाटले तर जबरदस्तीने खाणेही योग्य नाही. चुकीच्या वेळेला आणि भूक नसताना घेतलेला आहार शरीराला अपाय करतो. पण भूक नाही म्हणून सातत्याने कमी खाणेही चांगले नाही. भूक बेताची असताना थोडे हलके आणि सुपाच्य असे अन्न घेतलेले चांगले. सायंकाळचे जेवण फार उशिरा घेऊ नये दिवसाच्या तुलनेने रात्री पचनशक्ती कमी असल्याने आणि शारीरिक हालचालही नसल्याने रात्रीचा आहार कमी मात्रेत व हलका असावा. गर्भारपणात रात्रीचे जेवण अधिक केले आणि पचले नाही तर त्याचा भार गर्भाशयावर व छातीवर येऊन अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे दिवसात शक्यतोवर उशिरा जेवणे किंवा रात्रीच्या जेवणात इतर जड गोष्टी खाणे टाळलेले चांगले.
गर्भवतीचे पिण्याचे पाणी किमान पंधरा ते वीस मिनिटे उकळून निर्जंतुक केलेले असावे. कारण पाण्यातून चुकूनही जंताचा प्रादुर्भाव झाला तर शरीरावश्यक जीवनसत्वे आणि मुख्यत्वे लोह शरीराला पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. पर्यायाने वजन कमी होणे, अपचन होणे वगैरे त्रास होऊ शकतात. गरोदरपणात जंताचा नाश करणारी तीव्र औषधेही देता येत नसल्याने पाणी उकळून प्यावे.
नैसर्गिक रूपात प्रथिने (प्रोटीन) व कॅल्शियम प्राप्तीसाठी दूध सवोेत्तम होय. बाळाचे धातु परिपूर्ण व्हावेत, हाडे मजबूत व्हावीत यासाठी दुध मोलाचा हातभार लावते. कैक वेळा बाळंतपणानंतर स्त्रीची हाडे कमकुवत होताना दिसतात. पर्यायांने कंबरदुखी, सांधेदुखीसारखे त्रास मागे लागतात. हे परिणाम गर्भावस्थेत व नंतरही कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने असू शकतात. त्यादृष्टीने आधीपासूनच सकाळ-संध्याकाळ कपभर दूध घ्यावे. आयुर्वेदशास्त्रानेही जीवनशक्ती, ओजशक्ती वाढविण्यात दूध श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. बाळाची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी दूध महत्त्वाचे ठरते. आधुनिक विज्ञानानुसार दुधापासून जीवनसत्व ब (विटामीन बी कॉम्प्लेक्स) आणि जीवनसत्व अ (विटामिन ए) ही मिळतात.दूध उकळी येईपर्यंत व्यवस्थित तापविलेले असावे आणि शक्यतोवर कोमट किंवा सामान्य तापमानाचे झाल्यावर प्यावे. फ्रिजमधले थंडगार दूध न पिणेच इष्ट.
अनेकदा दूध आवडत नाही, वजन वाढेल वगैरे कारणांनी स्त्रिया दूध प्यायची टाळाटाळ करतात. पण दूध न घेतल्याने होणारे स्वतःचे आणि बाळाचे नुकसान अन्य कोणत्याही उपायाने भरू भरून येऊ शकत नाही हे लक्षात ठेवायला हवे. संपूर्ण गर्भावस्थेमध्ये सकाळ संध्याकाळ कपभर दुधात दीड-दोन चमचे शतावरी कल्प घालून घेणे अतिशय फायदेशीर ठरते. मात्र शतावरी कल्प शास्त्रीय पद्धतीने व उत्तम प्रतीच्या शतावरीपासून तयार केलेला आहे, याची खात्री असू द्यावी. गर्भवती स्त्रीचे पोषण, गर्भाची योग्य वाढ व स्तन्यनिर्मितीची तयारी या तिन्ही जबाबदाऱ्या पार पडण्याची क्षमता या शतावरी कल्पात असल्याने गर्भावस्थेचे नऊ महिने व प्रसूतीनंतरही बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत दूध व शतावरी कल्प चालू ठेवावे. पोषणाबरोबरच शतावरी मध्ये स्त्रिचा बांधा उत्तम ठेवण्याची क्षमता असल्याने गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरही स्त्रीचे वजन वाढू न देणे यामुळे साध्य होते.
ताजे गोड ताक हे ही रोज दुपारच्या जेवणानंतर लगेच घेणे पचनाकरिता व एकंदर आरोग्याकरिता चांगले असते. आयुर्वेदाने ताक वात - कफशामक, पचायला हलके, पोटाच्या कोणत्याही तक्रारीसाठी पथ्यकर सांगितले आहे. अन्नरुची नसणे, अॅनिमिया आणि गॅसेस वगैरे तक्रारींमध्ये लाभदायक असल्याने गर्भारपणात विशेष उपयोगी आहे, कित्येक स्त्रियांना शेवटच्या तीन चार महिन्यात अंगावर सूज येताना दिसते. ताक सूज कमी करणारे असल्याने गर्भारपणात नियमित घेणे उत्तम असते. फक्त ताक दूधाहूनही पातळ असेल याकडे लक्ष ठेवावे. तसेच ताक करताना दहयात पाणी घालून व्यवस्थित घुसळणेही महत्त्वाचे आहे. ताक म्हणते निव्वळ पातळ केलेले दही नव्हे. त्यावर घुसळण्याचा संस्कार होणे महत्त्वाचे असते.वाटीभर ताकात पाच चमचे जिऱ्याची पूड व दोन चिमूट काळे मीठ टाकून घेतल्यास ताक चवदारही लागते आणि अधिक फायदेशीर होते.
तूप सर्व स्निग्ध द्रव्यामध्ये श्रेष्ठ असून तिन्ही दोषांना संतुलित करणारे आहे. एकंदर जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती व ताकद वाढविणारे असून डोळे, कान वगैरे इंद्रिये उत्तम क्षमतेची राहण्यास मदत करणारे आहे. बुद्धी, स्मरणशक्ती व आकलनशक्ती तुपामुळे वाढते. म्हणूनच नियमित तूप खाल्ल्याने गर्भवतीला स्वताःला तर फायदा होतोच, बरोबरीने बाळही बुद्धीसंपन्न होण्यास मदत मिळते.

Comments
Post a Comment