जन्मपूर्व संस्कार - जागतिक प्रयत्नांचा आढावा
भारतामध्ये जन्मपूर्व संस्काराचा बराच मोठा इतिहास आहे. अभिमन्यूच्या उदाहरणाने तो महाभारत काळापर्यंत मागे गेलेला आहे. सध्याच्या विज्ञानयुगात एकविसाव्या शतकात मागोवा घेतांना असे दिसते की, जेथून सुरुवात झाली त्या भारतात त्या मानाने जन्मपूर्व संस्काराबद्दल कमी जाणीव आहे, तर जगात इतरत्र मात्र याबाबतीत बराच शास्त्रशुद्ध प्रयत्न करण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रयत्न कोणी व कुठे केला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.
जन्मपूर्व अवस्थेत गर्भाला कळू शकते अशा प्रकारच्या विधानाला पुष्टी देणारे वैज्ञानिक संदर्भ (पेपर्स) काही प्रमाणात माहिती (डाटा) प्रयोग हे १९४० पासून अधूनमधून प्रसिद्ध होत होते पण याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरी सुरुवात किंवा अशा प्रकारचा प्रयत्न, प्रथम सुमारे १९६४ सालापासून लोणावळे येथील न्यू वे आश्रमात सुरू झाला. भारतातील उगवत्या पिढीला गर्भातच घडविण्याची प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यातून सुरू झाले.
१) असोसिएशन फाॅर प्रि अँड पेरिनॅटल सायकॉलॉजी अँड हेल्थ:- जन्मपूर्व व व जन्म उत्तर अवस्थेमधील शारीरिक वाढ व मानसशास्त्र याबद्दल संशोधन करणारी ही एक महत्वाची संस्था १९८३ साली कॅनडा येथे स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक डॉ. थॉमस आर वेनीॆ (एम डी) हे आहेत. सदरच्या संस्थेमध्ये 'जन्मपूर्व अवस्थेमध्ये सुद्धा गर्भाला मानसिक आयुष्य असते' ही कल्पना मान्य असणाऱ्या कोणालाही प्रवेश आहे. यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, मानसशास्त्रज्ञ, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक इ. सर्वांचा समावेश आहे. १९८३ पासून दर दोन वर्षांनी जगामधल्या वेगवेगळ्या प्रमुख शहरात यांचे अधिवेशन भरते व त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था या विषयासंबंधी जाणीव निर्माण करणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण होते.
2) इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्रि अँड पेरिनॅटल सायकॉलॉजी अँड मेडिसिन - १९७१ साली जर्मनीत संस्था स्थापन झाली. तिचे कार्यक्षेत्र मुख्यतः युरोप मध्ये आहे. या संस्थेचे जागतिक अधिवेशन दर ३ वर्षांनी असते.
3)'वर्ल्ड ऑर्गनायझेशन अँड असोसिएशन फॅार प्रिनॅटल एज्युकेशन अँड लाइफ.
युनिव्हर्सिटी ऑफ साल्झबर्ग, ऑस्ट्रीया:- ऑस्ट्रेलियातील साल्झबर्ग विद्यापीठातील डॉ. गेरहर्ड राॅटमन यांनी १४१ गर्भवती महिलांचा अभ्यास केला, त्यामध्ये त्यांना असे आढळून आले की, आईच्या वृत्तीचा मुलावर महत्वपूर्ण परिणाम घडतो. आपले पोटातील मुल चांगले व्हावे, असे वाटणाऱ्या आदर्श मातांचे बाळंतपण सहज होते. त्यांची मुलेही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ बनतात. निराशावादी मातांना मुलाच्या जन्मवेळी खूप त्रास होतो. अशा मुलांचा जन्मही नऊ महिन्यांच्या आधीच होतो. ती मुले कमी वजनाची आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात.
(४) थायलंड:- थायलंड येथील डॉ. चैैैैरट पन्थूरामफॉजॆ यांनी जन्मपूर्व अवस्थेतील मुलांवर प्रयोग केले. सदरच्या प्रयोगात पालकांचा गर्भातील बालकाशी वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांमार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना असे लक्षात आले की, ही मुले जन्मानंतर आई वडिलांशी अधिक जवळ असतात त्यांना लवकर बोलता येते, ती लवकर हसू शकतात. या संदर्भात डॉक्टरांनी दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत
५) कॅरॅकस व्हेनेझुएला:- व्हेनेझुएला येथील मानसोपचारतज्ञ डॉक्टर बिएट्रीज मॅनरिक यांनी याविषयी केलेले संशोधन फार महत्वाचे आहे. वैज्ञानिक प्रयोगांच्या आवश्यकतांची पूर्ती करणारा जास्तीत जास्त लोकांवर केलेला हा संशोधन प्रयोग आहे. एकूण ६८० जोडप्यांवर हा प्रयोग केला गेला. या ६८० लोकांचे वर्गीकरण 'नियंत्रित गट' आणि 'प्रायोगिक गट' यामध्ये केले गेले. त्यामध्ये गर्भावस्थेत गर्भाला दिलेल्या शिक्षणाचा परिणाम हा जीवशास्त्रीय, मानसशास्त्रिय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा होतो हे तपासले गेले. जन्मपूर्व अवस्थेत दिलेल्या शिक्षणाचा परिणाम पुढे जन्मानंतर सहा वर्षे वयापर्यंत नोंदवला गेला. त्यामध्ये असा निष्कर्ष आला की, जन्मापूर्व अवस्थेतल्या शिक्षणामुळे मुलांमध्ये भाषा , स्मरणशक्ती , निरीक्षणशक्ती , बोलण्याची शक्ती व नियंत्रण शक्ती या सातत्याने उच्च प्रतीच्या आढळल्या. त्याशिवाय गर्भवती माता सुद्धा अधिक धैर्याने प्रसूतीला सामोर्या गेल्या. वडिलांचा मुलांबरोबर व कुटुंबाबरोबर एक चांगल्या प्रकारचा बंध निर्माण होऊन एकंदरच कुटुंबामध्ये एकसंधपणा दिसून आला. या सर्व गोष्टींमुळे व्हेनेझुएला येथील प्रशासन आता सरकारी पातळीवर हा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
६) गर्भाची वाढ आणि पालक:- गर्भ विकसित होण्याच्या काळामध्ये, पालकांचा म्हणजे मातेचा व पित्याचा महत्त्वाचा वाटा असतो. गर्भाच्या चांगल्या वाढीसाठी आहार कसा असावा व कसा नसावा, आहाराचा परिणाम गर्भाच्या वाढीवर कसा होतो, याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पालकांना असणाऱ्या सवयीचा परिणाम गर्भावर कसा होतो, याबाबतही संदर्भ उपलब्ध आहेत. उदा. मातेने सिगारेट ओढणे, मदय घेणे यामुळे गर्भावर होणाऱ्या वाईट परिणामांची नोंद शास्त्रज्ञांनी केली आहे. आता त्या पुढील पायरी म्हणजे, माता करीत असलेल्या विचारांचा परिणाम गर्भावर कसा होऊ शकतो, यावरही प्रयोग केले गेले आहेत. दि. १५ ऑगस्ट १९९६ च्या दै. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्रात याबाबतचे चीनमधील संशोधकांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ते असे - Unhappy moms may produce stupid babies ! त्याचा निष्कर्ष असा आहे की, जी माता स्वभावाने चंचल, असमाधानी असेल, तिच्या पोटी मंद मुल जन्माला येण्याची शक्यता असते. टॉंगी मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांना असे लक्षात आले की, काही कारणामुळे गर्भवती महिलेचा जर भावनाक्षोभ झाला तर 'कॅटेकलामाईन' नावाचे हार्मोन शरीरात स्त्रवले जाते व ते गर्भाच्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करते. त्यामुळे जन्माला येणारे मुल हे मंद होण्याची शक्यता असते. म्हणून गर्भवती मातेने येणाऱ्या अपत्यासाठी तरी आपल्या स्वभावात बदल करणे अगत्याचे ठरेल.
७) जन्माची वेळ:- जन्म घेण्याची किंवा जन्म होण्याची प्रक्रिया एका तऱ्हेने गुंतागुंतीची असते. ही सर्व प्रक्रिया कोणाच्या नियंत्रणाखाली असते? याचे सूत्रसंचालन कोण करते? जन्माला येणारा जीव करतो? की त्याचे पालन पोषण करणारे त्याची माता करते. हा अगदी पुरातन काळापासून पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर जरी मिळाले नसले तरी शास्त्रज्ञांना असे लक्षात आले आहे की, जन्माच्या प्रक्रियेमध्ये गर्भ किंवा येणारा जीव याची नुसती बघ्याची भूमिका नसते. त्याउलट येणारा जीव हा या सर्व प्रक्रियेमध्ये हिरीरीने सहभाग घेतो. त्यामुळे जन्माच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे लागेल. 'अमेरिकन सायंटिस्ट' या मासिकाच्या नोव्हें / डिसें १९९६ च्या अंकात डाॅ. पीटर डब्ल्यू. नॅथनिल्झ यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. नॅथनिल्झ हे गर्भधारणा व प्रसूती विषयी संशोधन करणाऱ्या 'कॉरनेल लॅबोरेटरी' चे संचालक आहेत. 'लाईफ बिफोर बर्थ' या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जन्माला येण्याची वेळ ही सुद्धा जन्माला येणारा गर्भच ठरवीत असतो. गर्भाची वाढ पूर्ण झाल्यानंतर तो तसा संदेश 'हार्मोन्स' द्वारा आईला पाठवतो. हा संदेश गर्भाच्या मेंदूकडून पाठवला जातो व त्यानंतर मातेला प्रसूतीवेदना होण्यास सुरुवात होते. आपण केव्हा व कोणत्या वेळी जन्माला यायचे हे जर गर्भ ठरवत असेल तर आत्तापर्यंत आपण मानत आलेल्या सर्वच गोष्टींचे पूनॆमूल्यांकन करावे लागेल.
८) जन्मापूर्वी ऐकलेले अंगाईगीत, मुलाला नंतरही शांत करते. (संदर्भ - रीडर्स डायजेस्ट, मार्च १९८५, पान ९३, प्रयोग विभाग संदर्भ क्र. 2अ)
हेलन ही गर्भवती स्त्री रोज संध्याकाळी आपल्या पोटातील बाळासाठी सुंदर अंगाईगीत म्हणायची. हेलन सांगते की, तिच्या मुलाच्या जन्मानंतर आता तेच सुंदर अंगाईगीत मुलावर आश्चर्यकारक परिणाम करते. मुलगा कितीही रडत असला, तरी ते अंगाईगीत ऐकल्यावर तो लगेच शांत होतो!
९) तालबद्ध ध्वनी, मानवी आवाज, गर्भावर सर्वाधिक परिणाम करतो (संदर्भ - 'The Psychology of Child Birth', पान २६, प्र.वि.क्र.५ ब)
गर्भातील मुलाच्या हृदयाचे ठोके मोजता येतात, तसेच रेकॉर्डही करता येतात. आईच्या पोटावर विशिष्ट आवाज निर्माण केले, तर त्याचा बाळाच्या हृदय - ठोक्यांवर परिणाम होतो. तोही पाहता येतो. अशाप्रकारच्या प्रयोगात असे दिसून आले की, साध्या ध्वनिलहरीपेक्षा तालबद्ध आवाजाला मूल अधिक चांगला प्रतिसाद देते. आणि त्यापैकी मानवी आवाजातील मूलभूत ध्वनिलहरी, गर्भावर सर्वाधिक परिणाम करतात. जॉन हटच्या संशोधनावरूनही हे सिद्ध झाले आहे की, उच्च ध्वनिलहरींना पोटातील मुल चांगला प्रतिसाद देते.
१0) गर्भावस्थेत शिक्षण (संदर्भ- दै. 'सामना' २४/१०/१९९०; प्रयोगविभाग संदर्भ क्र.१२)
सेथ किनास्ट हा तीन वर्षाचा मुलगा तीन भाषा बोलू शकतो. त्याची बुद्धिमत्ता सहा वर्षाच्या मुलाच्या बुद्धीमत्तेएवढी आहे. त्याच्या जन्मापूर्वी त्याची आई ट्रिना हिने, गर्भातील बाळासाठी वाचन केले. वर्तमानपत्रापासून बालसाहित्यापर्यंत सर्व वाचन केले. आई-वडील दोघेही हे वाचन मोठ्याने करत. सेथ कॉम्प्युटर आनंदाने चालवतो. मोठ्यांचे संभाषण काय चालले आहे, हे त्याला समजते. पृथ्वीगोलावरील वेगवेगळे देश तो ओळखतो. इंग्लिश मुळाक्षरे तो उलट-सुलट क्रमाने उच्चारतो. तो सव्वा वर्षाचा
सतानाच दुकानावरच्या पाट्या वाचू लागला. या विषयी झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, मुलाच्या जन्मा आधी काही आठवडे अवतीभवती होणारे आवाज गर्भातील मुल ऐकू शकते.
११) मुल आई-वडिलांना आवाजाने ओळखते (संदर्भ - दै. 'तरुण भारत' दि.८/१/८६, 'लोकसत्ता' दि.१२/१/८६, प्रयोगविभाग संदर्भ क्र.९ व ११)
डॅनिएल्सन दंपती हे डॉ.एफ रेन व्हॅन डी कार यांनी चालवलेल्या 'पेरेंटल युनिव्हर्सिटी' चे सदस्य. त्यातील एका प्रयोगाला अनुसरून, रॉबर्ट डॅनिएल्सननी एक प्रयोग केला. त्याच्या पत्नीला नववा महिना चालू असताना, रोज सकाळी आणि संध्याकाळी रॉबर्ट तिच्या पोटाशी तोंड नेऊन बाळाला शुभेच्छा देई. पुत्राचा जन्म झाल्यानंतर, बाळ रडत असताना रॉबर्टने त्याला हाक मारली, "हाय बेबी! धिस इज डॅडी!" हे ऐकून त्या मुलानं आपलं रडणं थांबवलं आणि आवाजाच्या अनुरोधाने मान वळवून डोकं उचलण्यासाठी धडपड केली!डॅनिएल्सन दाम्पत्याचा हा मुलगा, चौथ्या महिन्यात बोलू लागला. अवघड शब्दही तो लवकर शिकला. त्याला 'सुपीरियर बेबी' ही पदवी देण्यात आली. पोटात असताना, मुले विशिष्ट ध्वनी बद्दल ओळखू शकतात. रॉबर्टने हाक मारल्यावर, विशिष्ट काळानंतर पोटातील मूल ढुशी मारत असे. डॉ. कार यांनी, गर्भावस्थेतील मुलांसाठी एक अभ्यासक्रम आखला आहे. या अभ्यासक्रमातून गेलेली मुले अधिक तल्लख आणि इतर मुलांपेक्षा दोन पावले पुढे असतात, असे आढळून आले आहे. गर्भावस्थेत असताना चेतापेशींना मिळालेली प्रतिसादाची चेतना कायम रहाते आणि नंतरच्या आयुष्यात उपयोगी पडते. चेतापेशी जेवढ्या जास्त वापराव्या तेवढी त्यांची स्मृतीसंचय क्षमता वाढते, असे डॉ. कार यांचे मत आहे.
%20(7).png)
Comments
Post a Comment