बालसंगोपन
बाळाचा जन्म ही आनंदाची घटना असली तरी बहुतेक वेळेला नवोदीत मातापिता गोंधळलेले असतात. घरातल्या मोठया स्त्रीयांच्या सांगण्यानुसार त्यांचे बालसंगोपन चालू असते. परंतु आताची विभक्त कुटूंब पध्दती पाहाता प्रत्येक पालकाने स्वतः संगोपनाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.
बाळ रडत असलं की घरातली सगळी मंडळी घाबरुन जातात. बाळाच रडणं हे त्याच्या संवादाच माध्यम आहे. त्याला कदाचित भूक लागली असल्यास, झोप आली असल्यास, उकडत किंवा थंडी वाजत असल्यास, पोटात दुखत (कॉलिक पेन्स) असल्यास.. ह्यापैकी कुठल्याही कारणांसाठी रडतात. बरेचवेळा ही लहान बाळं संध्याकाळच्या वेळेला टीपेचा सूर लावतात. सवयीने पालकांना बाळाच्या रडण्यातला फरक लक्षात येतो. बाळांच हे रडणं समजावून घेतल्यास त्याला शांत करणं सोप जात .
नवजात बालकाच्या जन्मापासून ते तीन महिन्यांपर्यंत बाळाच्या बरयाचश्या हालचाली ह्या ‘रिफ्लेक्सईव्ह’ असतात. परंतु बाळ साधारण तीन महिन्याचे झाले की त्याची समज अधिक वाढलेली असते. त्याच्या हनुवटीवर बोट ठेवल्यास, स्तनाचा वास किंवा स्पर्श झाल्यास बाळ आपोआप मान त्या दिशेने वळवते. वातावरणातला फरकही बाळाला कळतो. कपडे किंवा दुपटी बदलतांना आपले हातपाय लांब करुन बाळ ते जाहीर करत असते.
बाळ साधारणतः पाचव्या सहाव्या महिन्यात बसायला सुरुवात करते. त्या अगोदर त्याला जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न करू नये. आपण होऊनही बसायला लागल्यावर सुरुवातीला त्याला फार वेळ बसू देऊ नये. कारण त्यामुळे बाळाच्या पाठीला पोक येऊ शकते. किंवा त्याच्या पाठीचा कणा कमकुवत राहू शकतो. हीच काळजी बाळ उभे राहू लागता घ्यावी. जबरदस्तीने हाताला धरून उभे केल्याने किंवा वॉकरमध्ये ठेवून चालवल्याने पाय वाकू शकतात व मुले थकूही शकतात. मुलांच्या शारीरिक विकासाचा एक नैसर्गिक क्रम ठरलेला असतो. त्याप्रमाणे बाळाला सर्व क्रिया स्वतःच्या स्वतः ठरलेल्या क्रमाने व ठरलेल्या वेळीच करू द्यावेत. दहा महिन्याचा झाला तरी आपले बाळ अजून चालत कसे नाही अशी अकारण काळजी करून त्याला हात धरून चालविण्याची किंवा वॉकर देण्याची गरज नसते.
मुलांना पाण्याऐवजी खाली जमिनीवर गादी घालून ठेवणे व झोपविणे चांगले कारण त्यामुळे बाळाला चौफेर बघता येते व हालचालही करायला पुरेसा वाव मिळतो. बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडायला लागले की पाळण्यातून, पलंगावरून खाली पडण्याची भीती असल्याने बाळाला जमिनीवरच झोपवावे.
अगदी तान्हया बाळासाठी पाळणा वापरतांना पाळण्यावर बाळाच्या अगदी डोक्यावर गरगर फिरणारे झुंबर किंवा तत्सम भडक व कर्कश आणि मोठा आवाज करणारी खेळणी लटकवू नयेत. अशी डोक्यावर गरगर फिरणारी खेळणी बघून बाळ रडायचे थांबले तरी ते बहुधा भांबावून गेलेले असते. शिवाय अशा खेळण्यामुळे बाळाच्या डोळ्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.
लहान बाळाशी अगदी सुरुवातीपासून काही ना काही बोलत राहावे. इतक्या लहान बाळाला काय समजणार असा विचारही मनात आणू नये. आणि मुख्य म्हणजे बोलणे स्पष्ट, शुद्ध, अर्थपूर्ण, व सुसंबध्द असावे. लहान मुलांच्या आसपास भांडणे, तावातावाने बोलणे, रागावणे, आदळआपट करणे, टाळावे. अगदी लहान मुलांनाही घरात काय चालले आहे घरातील माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे कळत असते. म्हणून लहान मुले असणाऱ्या घरातल्या माणसांनी फक्त मुलाशीच नव्हे तर आपापसात बोलतांनाही काळजीपूर्वक बोलावे. कोणताही अपशब्द किंवा कोणाबद्दल वाईट साईट बोलू नये. काळे-गोरे, श्रीमंत गरीब सुंदर कुरूप अशा प्रकारच्या तुलना किंवा भेदभाव मुलांसमोर न करणेच चांगले.
बाळ बसू लागले की त्याला शी-शू नियमित वेळेला करण्याच्या दृष्टीने सवय लावण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठल्यावर शी-शू होण्यासाठी बसवावे, रात्री झोपण्यापूर्वी शू करण्याची सवय लावावी. एरवीही साधारण वेळेचा अंदाज घेऊन शू करण्यास सांगावे. या प्रकारे सुरवातीपासून सवय लावल्यास या क्रियांमध्ये नियमितता येते.
वास्तविक दोन वर्षापर्यंतच्या मुलांना उपजत भितीची भावना नसते. त्यामुळे या वयात भीती दाखविल्यास मनावर भीतीचा पगडा बसून नंतरही भीती कायम घर करून राहते. भीती ही नैसर्गिक भावना असल्याने स्वभावानुसार थोड्या फार प्रमाणात येतेच फक्त त्यात आपल्या वागणुकीने भर टाकली जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे. विशेषतः जरा समज आलेल्या मुलांना चुकूनही कसली भीती दाखवू नये. जसजसे मूल मोठे होईल तसतसे त्याच्या मानसिक विकासाला पूरक ठरतील. कल्पकतेला वाव देतील अशी खेळणी खेळायला द्यावीत. मुलाच्या नाकातोंडात जाऊ शकतील किंवा घशात जाऊन अडकू शकतील अशी आकाराची नसावीत. उदा. नाणी, गोट्यांसारख्या लहान लहान गोष्टींशी अगदी लहान मुलांना खेळू देऊ नये.
मुलं तीन वर्षाचे होईपर्यंत साधारण ११-१२ तास झोपणे आवश्यक असते. अगदी लहान बाळ झोप आली की झोपून जाते. मात्र साधारण वर्षा दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलाला रात्री वेळेवर म्हणजे साधारण आठ साडेआठच्या सुमाराला झोपवायला हवे. रात्री मुलांना बाहेर निल्याने किंवा घरात टीव्ही गप्पा वगैरे सुरू असतील तर जरा समज आलेल्या मुलांना झोपायची इच्छा होत नाही. याकरिता आई-वडिलांनी व घरातल्या इतर व्यक्तींनी स्वतःच्या दिनक्रमात बदल करावा, पण मुलांना वेळेवर झोपवावे. तीन चार वर्षापर्यंत मुलांनी दुपारी थोडावेळ झोपणेही चांगले असते. पुरेशा झोपेमुळे मेंदूला आवश्यक तेवढी विश्रांती मिळून मेंदूचा सर्वांगीण विकास व्हायला मदत मिळते.
कोणतीही गोष्ट मिळाली की त्याचा आनंद सगळ्यांनाच होतो पण इतरांना काही देण्यातही आनंद असतो हे मुलांना दाखवून द्यावे. उदा. घरात चार पाच मुले जमली तर मुलाच्या हातून प्रत्येकाच्या हातावर थोडासा खाऊ देणे किंवा वाढदिवसाच्या दिवशी शाळेतल्या शेजार पाजारच्या मुलांना छोटीशी भेट देणे अशी छोट्या छोट्या गोष्टीतून लहान मुलांना शेअरिंगची सवय लावावी.
मुलांना हॅरी पॉटर, पोकेमोन वगैरे हिंसक काल्पनिक गोष्टी दाखविण्यापेक्षा किंवा हिंसक वृत्ती वाढविणाऱ्या व्हिडिओ गेम्सची सवय लावण्यापेक्षा प्रबोधन करणाऱ्या पंचतंत्र, राम ,कृष्ण, हनुमान सारख्या पुराणकथा, परी कथा सांगाव्यात व दाखवाव्यात. एकसारखा टीव्ही बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होतो हे तर सर्वज्ञात आहेच शिवाय एक सारखे बसून राहण्याची सवय लागल्याने मुल आळशी होण्याची शक्यताही वाढते.
.png)
Comments
Post a Comment