जन्मपूर्व अवस्थेत शिक्षण का
माणसाच्या जीवनाची सुरवात तो या जगात प्रत्यक्ष जन्माला येतो त्या क्षणापासून धरली जाते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. जीवनाची सुरुवात जन्म होतो त्या क्षणाला त्या वेळेला होत नसून गर्भधारणेच्या क्षणाला होत असते.
शुक्राणू व स्त्रीबीज यांचे मिलन होऊन फलित झालेली पेशी (एम्ब्रियो) आणि अन्य सामान्य पेशी यांच्यात खूप फरक असतो. एम्ब्रियोमध्ये स्वतःला वाढविण्याची क्षमता असते, स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असते, थोडक्यात त्याला "जाणीव" असते आणि तो "बुद्धिमान" ही असतो. इतर पेशी पेक्षा एम्ब्रियोला ही विलक्षण क्षमता कशामुळे प्राप्त होते? तर त्यामध्ये जीवन जगण्यासाठीची "जाणीव" निर्माण झालेली असते किंवा त्यात जीव-शक्ती किंवा प्राण-शक्तीची धारणा झालेली असते. हया जाणीवेमुळेच एम्ब्रियोमध्ये प्रथम पासूनच शिकण्याची क्षमता निर्माण झालेली असतेे.
गर्भामध्ये मुल असताना त्याची नाळ आईशी जोडलेली असते. त्यामुळे आईकडून त्याला रासायनिक संदेश मिळत असतात. या संदेशाप्रमाणे ते मूल आपले मत ठरवत असते.
मेंदू हा संपूर्ण आयुष्यभर, अनुभवांना संवेदनशील असतो. परंतू मेंदूची सर्वात वेगाने जडणघडण होणाऱ्या जन्मपूर्व अवस्थेत व जन्मानंतर लगेच मेंदू सर्वाधिकसंवेदनशील असतो. मेंदूमधील पेशींना 'चेतापेशी' किंवा 'न्यूरॉन' असे संबोधतात. गर्भधारणेनंतर अवघ्या चौदाव्या दिवशी पहिला न्यूरॉन तयार होतो त्यानंतर दर मिनीटाला अडीच लाख न्यूरॉन्स या प्रचंड गतीने न्यूरॉन्सच्या निर्मितीचा कारखानाच सुरु होतो. आयुष्यामध्ये लागणाऱ्या एकूण मेंदूपेशी पैकी सुमारे 60% पेक्षा जास्त मेंदूपेशी या गर्भावस्थेमध्ये तयार होतात. मेंदूपेशी तयार झाल्या की त्यांना येत असलेला अनुभव साठवण्यासाठी त्यांची एक प्रकारची जोडणी सुरू होते. ही जोडणी पक्की असेल तर अनुभव चांगल्या तऱ्हेने लक्षात राहण्याची क्रिया होते. म्हणून आपले मूल बुद्धिमान, तेजस्वी होण्यासाठी, मेंदूपेशींची ही जोडणी सक्षम, बळकट होणे आवश्यक असते.
आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असल्यामुळे तिच्या आचार-विचारांचा, आहार-विहारांचा समजुतीचा आणि स्वभावाचा सुद्धा परिणाम गर्भावर होत असतो. बाहेरचे जग तो स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे त्याला आईकडून येणाऱ्या संदेशावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. हे संदेश 'हार्मोन्स'च्या स्वरूपात असतात (केमिकल सिग्नल्स असतात). म्हणून आईला बाह्य जग कसे वाटते हे महत्त्वाचे असते. ते जग आनंदी आहे का कंटाळवाणे आहे, ते सुष्ट आहे की दृष्ट आहे हे तिला जसे वाटत असते तसे ते अप्रत्यक्षरित्या गर्भापर्यंत पोहोचत असते. हा जो अनुभव गर्भाला आईमार्फत मिळतो त्याप्रमाणे तो स्वतःत बदल करत असतो.
या पार्श्वभूमीवर, आईचे व्यक्तिमत्व जर अवाजवी ताण घेणारे असेल, जास्त संवेदनशील असेल, असमाधानी असेल तर त्याची झळ पोटात वाढणाऱ्या गर्भापर्यंत निश्चित पोहोचते. ताणाचे कारण काही जरी असले तरी त्याचा त्रास गर्भाला होतो, कारण आईच्या ताणामुळे गर्भामधील न्यूरॉन्सची जोडणी नीट होत नाही.
आईच्या मनामधील ताणाप्रमाणेच गर्भाच्या वाढीशी निगडीत दुसरा मुद्दा म्हणजे तिच्या मनात असलेली 'भिती' विशेषतः पहिले बाळंतपण असेल तर अनाकलनीय भिती वाटते. अनेकवेळा कानावर येणाऱ्या बातम्यांमुळे "माझे काय होईल?" ही शंका आणि त्याला जोडलेली भिती मनात घर करून राहते. काही वेळेला काही मातांचा स्वभावसुद्धा अवाजवी काळजी करणारा, मनात एरवी न येणारे विचार नेमके या काळात आणणारा असा असतो. या सर्वांचा परिणाम पोटातल्या मुलाच्या वाढीवर होतो.
पेशी विज्ञानाप्रमाणे प्रेमळ वातावरणात पेशींची वाढ उत्तम होते. त्यामुळे आईच्या मनात येणाऱ्या बाळाविषयी प्रेम असेल, आपुलकी असेल तर त्या वाढणाऱ्या पेशीभोवती म्हणजेच गर्भाभोवती तसे वातावरण निर्माण होते व त्याची वाढ चांगली होते. याउलट आजूबाजूचे वातावरण भितीदायक असेल, किंवा आईच्या मनातील भितीमुळे तसे ते होत असेल तर मात्र ती पेशी त्या भितीपासून, संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्यास प्राधान्य देते. त्यामुळे त्या पेशींची वाढ खुंटते व या सर्वांचा परिणाम डिलेव्हरीनंतर बाळाच्या वजनामध्ये दिसतो. भित्र्या आईच्या छायेखाली गर्भात वाढणारी मुले ही पूर्ण दिवसांची असून सुद्धा वजनाला कमी भरतात. तर योग्य विचारांच्या समतोल मातेची मुले, धैर्य बाळगणाऱ्या मातेची मुले, अपेक्षित वजन असलेली किंबहुना थोडे जास्तच वजन असलेली निपजतात. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची, हसत खेळत राहणारी, कोणाचाही मत्सर न करता निर्व्याज प्रेम करणारी माता, निश्चितच निरोगी, तेजस्वी आणि बुद्धिमान अपत्याला जन्म देईल. यावरून गरोदरपणातील आईची मानसिक स्थिती योग्य असणे किती महत्त्वाचे असते हे लक्षात येईल.
गर्भ आईच्या पोटात वाढत असल्यामुळे आईच्या आहार विहाराचा परिणाम त्या गर्भावर होत असतो हे आपण तर्काने समजू शकतो. पण आताचे संशोधन असे सांगते की, ज्याप्रमाणे आईच्या भावना मुलापर्यंत पोहोचतात, तशाच पोटामधल्या बाळाच्या भावनांचाही परिणाम आईवर होत असतो. रासायनिक प्रक्रियेमार्फत ही देवाणघेवाण दोघांकडूनही चालू असते.
याला पुरक अशी एक रूढी आपल्याकडे प्रचलित आहे ती म्हणजे 'डोहाळे पुरविण्याची' .डोहाळे म्हणजे स्त्रीची इच्छा नाही, तर ती दोन जीवांची इच्छा असते. एक जीव सांगतो आणि दुसरा मागतो, म्हणूनच डोहाळयांच्या बाबतीत भारतीय संस्कृतीने योग्य ती संवेदनशीलता आणि सुसंस्कारी दृष्टी दाखवली आहे. डोहाळयाच्या कार्यक्रमामध्ये गर्भवती मातेला आनंदी, प्रसन्न ठेवावे असा हेतू असतो. तसेच येणाऱ्या बालकांच्या इच्छा त्याच्या आईमार्फत पूर्ण होun , माता आणि तिच्या पोटातले बाळ यामध्ये सुसंवाद साधला जातो. याचे प्राचीन धर्मशास्त्रील पुरावे - रामायणात कौशल्येला गरोदरपणी आपण धनुष्यबाण घेऊन युद्ध करावे, रानावनात जावे, राक्षसांचा उपद्रव दूर करावा असे डोहाळे लागायचे. पुढे होणाऱ्या पुत्राच्या वीरतेचेच हे निर्देशक होते आणि प्रत्यक्षात भगवंतांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी जन्म घेतला. भगवान महावीरांना गर्भावस्थेत असतांनाच मति, श्रुती, अवघी ज्ञानाची प्राप्ती होती व त्या गर्भाच्या संयोगाने त्रिशला मातेला जैन शास्त्रातील अवघड शब्दार्थ व तत्त्वे तात्काळ उमगत होती, जी तिला गर्भावस्थेपूर्वी कठीण वाटायची, यासारखे अनेक उदाहरणे देता येतील.
एकदा आपल्या मनात जन्मपूर्व अवस्थेत शिक्षण ही कल्पना रुजली की पुढले काम सोपे आहे. ज्या मुलाला काही कळत नाही अशा मुलाला शाळेत घालून तरी काय उपयोग? आणि म्हणून गर्भावर संस्कार करण्यासाठी त्याला सर्व काही कळते आहे ही खात्री व विश्वास आपण बाळगला पाहिजे.
.png)
Comments
Post a Comment