Tuesday, November 9, 2021

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुप्रजनन

 


आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुप्रजा निर्मितीसाठी ३ टप्प्यांमध्ये तयारी केली जाते.

१) बीजशुद्धी:- "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी"

शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते. त्यासाठी पंचकर्माद्वारे पतिपत्नींची शरीरशुद्धी, आहारविहार नियोजन करून स्त्रीबीज व पुरुषबीज शुद्धी साधणे.

२) गर्भावस्थेतील संस्कार:- यामध्ये गर्भिणीकरिता विशिष्ट आहार, आचरण, आसने, प्राणायाम, संपूर्ण शिथिलीकरण, समुपदेशन, ज्योतिध्यान केल्या जाते. तर गर्भाच्या इंद्रियांची व बुद्धीची योग्य वाढ होण्यासाठी केले जाणारे उपचार, गर्भसंवाद, गर्भसंगीत, वाचन, सुखप्रसूतीसाठी करावयाचे प्रयत्न यांचा समावेश होतो. हे सर्व उपक्रम गर्भसंस्काराअंतर्गत केल्या जातात.

३) प्रसूतीपश्चात संस्कार:- यात प्रसूतीनंतर मातेचे व बालकाचे सुआरोग्य यासाठी केले जाणारे प्रयत्न यांचा समावेश होतो. प्रसूतीनंतर निसर्गतःच मातेच्या शरीरात वात वाढत असतो तो समस्थितीत राखण्यासाठी अभ्यंग, गरम पाणी व पारंपारिक आहार याचा वापर केला जातो. वजन आटोक्यात राहावे व पोट सुटू नये यासाठी केले जाणारे उपचार बाळाच्या सुदृढ व निरोगी त्वचेकरिता अभ्यंग तर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशिष्ट औषधीचाटण.   

सुप्रजा निर्माण होण्यास वातादि त्रिदोष, रसादि सप्तधातू हे सर्व घटक सारवान व बलवान असणे आवश्यक आहे. अर्थात पतीपत्नीने 'सुप्रजा जन्माला यावी' हयाची जाणीव ठेवून जर त्या दिशेने योग्य ते प्रयत्न केले तर नक्कीच उपयोग होऊ शकतो. सुप्रजा निर्माण होण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे शारीरिक व मानसिक पातळीवर करायला हवे. स्त्री व पुरुष या दोघांचेही शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे म्हणजेच निर्माण होणारे बीज निर्मल असेल.

शरीरशुद्धीसाठी प्रकृतीनुरूप आयुर्वेदोक्त पंचकर्म करून घ्यावे. शरीरशुद्धीने बीजातले दोष तर दूर होतातच शिवाय बीजाची ताकद वाढविण्यासाठी बीजाला वियॆवान, सर्वसंपन्न बनविण्यासाठी जी रसायने आयुर्वेदशास्त्र सुचविते ती सर्व अधिकाधिक शरीरात शोषून त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी शरीरशुद्धीची मोलाची मदत मिळते. शरीरशुद्धीने सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. या साऱ्यांचा उपयोग गर्भधारणा होण्यास, पुढे ९ महिने तो गर्भ व्यवस्थित टिकण्यास व आरोग्यसंपन्न अपत्य प्राप्ती होण्यास निश्चितच होतो. शरीरशुद्धीबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम राखणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी ध्यान, ओमकार गुंजन, मंत्रपठण, प्राणायाम व सात्विक साहित्यवाचन यांचा उपयोग होतो.


वंशानुक्रमे (heriditory) येणारे रोग जसे मधुमेह, लठ्ठपणा, दृष्टिदोष, थायरॉईड, ग्रंथींचे आजार यांचे प्रमाण खूप वाढले आहे. लहान वयातच मुलांना चष्मे लागताहेत. शाळेतील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेय. कमी वयातच थायरॉईड ग्रंथींचे आजार आढळताहेत. सगळ्यात वाईट म्हणजे आयुर्वेद ज्याला रोगांचा राजा म्हणतेय तो मधुमेहसुद्धा लहान मुलांमध्ये आढळतोय. मधुमेह झालेल्या मुलांचे पुढील आयुष्य हे अतिशय कठीण व त्रासदायक असते. माता व पिता या दोघांचा शुक्रधातू बलवान असणे अत्यंत जरुरीचे आहे. शुक्रधातूचे 'जनन' हे मुख्य कार्य आहे. तसेच स्त्रीच्या गर्भाशयादी अवयवांची वाढ शुक्रधातूवरच अवलंबून असते. गर्भधारणा, गर्भपोषण व सुलभप्रसूती यासाठी गर्भाशय बलवान असणे आवश्यक आहे. ज्यांच्या पहिल्या संततीमध्ये किंवा घराण्यात काही शारीरिक वा मानसिक व्यंग आहे अशा दांपत्यांनी तर सुप्रजननाच्या संपूर्ण प्रक्रियेचे तंतोतंत पालन अवश्य करावे ज्यामुळे येणारी संतती ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी तर राहीलच शिवाय वंशानुक्रमे येणाऱ्या रोगांपासून मुक्त होईल.


आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुप्रजनन कसे करावे?

व्हिडिओ साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

https://youtu.be/0c80WT3Dl10

No comments:

Post a Comment

Foods That Support Baby Brain Development During Pregnancy

  During pregnancy, a mother’s diet plays a major role in the baby’s brain growth and nervous system development. Certain nutrients help imp...