Sunday, November 20, 2022

गर्भविश्व

 








गर्भ धारणेनंतर वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती होते, त्याचा विकास होऊ लागतो आणि त्यांचे कार्य सुरू होते. गर्भधारणेनंतर बाविसाव्या दिवशी नेहमीसारखे हृदय तयार झालेले नसते. फक्त दोन नळ्या असतात. त्या जोडल्या जाऊन त्यातून रक्तप्रवाह सुरू होतो. या एकाच गोष्टीवरून मानवी गर्भाची वाढ कशी वेगवेगळ्या तऱ्हेने होते हे दिसून येते. एरवी कुठलीही गोष्ट किंवा वस्तू कार्यान्वित होण्यासाठी त्याचे सगळे भाग जोडले गेल्याशिवाय ती चालू होत नाही. पण माणसाच्या निर्मितीचे असे नाही. जो भाग ज्या स्वरूपात सुरवातीला असतो त्याच स्वरूपात त्याचे कार्य सुरू होते. नंतर तो भाग संपूर्ण प्रगत अशा स्वरूपात यथावकाश तयार होतो. गर्भाची वाढ व विकास होताना हा वैशिष्ट्यपूर्ण फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी सुसंवाद होण्यासाठी ते ते इंद्रिय पूर्ण विकसित होण्याची गरज नसते.

​ऐकू येण्याची क्रिया ही मुख्यतः कानाशी संबंधित असते. कानामधील आवाज शोषणाऱ्या पेशी ज्यांना "कोर्टी पेशी" म्हणतात तशाच पेशी सर्व शरीरभर त्वचेवर असतात. त्यामुळे संपूर्ण शरीर हाच एक मोठा कान होतो म्हणून जन्माच्या पूर्वी जोपर्यंत कान तयार होत नाही तोपर्यंत संपूर्ण शरीर हे एक प्रकारचे आवाजाचे रिसिवर म्हणून काम करते. मूल गर्भामध्ये असतानाच त्याला ऐकू येण्याची क्षमता असणे हा त्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षमतेमुळे गर्भाचा बाह्य जगाशी संबंध जोडला जातो. केवळ 'जन्म झाल्यानंतर' मग बाळ आईचा आवाज ओळखते असे नसून जन्माअगोदर गर्भावस्थेतच आईचा आवाज ओळखण्याची व ती लक्षात ठेवण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले. गर्भावस्थेमध्ये शिक्षण चालू असल्याचा हा एक पुरावाच आहे. प्रतिसादपूर्वक ऐकणे ही प्रक्रिया गर्भधारणेपासून सोळाव्या आठवड्यातच सुरू होते.


     गर्भाला ऐकू येते, आवाज कळतो या वस्तुस्थितीचे फायदे आहेत तसे काही धोके सुद्धा त्यामुळे निर्माण होतात. तुम्ही कोणाशी बोलता, कसं बोलता, किती प्रेमाने किंवा संतापून बोलता हे सर्व आवाज गर्भापर्यंत आत पोहोचत असतात. तुमच्या बोलण्यामध्ये राग असेल, भीती असेल तर तशी जाणीव गर्भाला होत असते.


Association for pre & perinatal psychology & health च्या जागतिक परिषदेत एका इटालियन संशोधन संस्थेतर्फे एक व्हिडीओ क्लिपिंग दाखविण्यात आले त्या व्हिडिओमधील प्रसंग असा होता-

     गर्भधारणा झालेले दाम्पत्य एकमेकांशी बोलताहेत, त्याच वेळेला त्या बाईच्या गर्भातील बाळाची अल्ट्रासाऊंड २डी इमेज पडद्यावर दाखविली गेली. नवरा बायको बोलत असताना त्यांचे बोलणे विकोपाला जाते. नवरा खूप संतापतो, त्या बाळाची आई सुद्धा रागावते. दोघांनाही आपला राग आपल्या पोटातल्या बाळापर्यंत पोहोचतोय याची कल्पना नसते. नवरा रागाच्या भरात हातातला काचेचा ग्लास जोरात समोरच्या भिंतीवर फेकून देतो, खळखन आवाज होतो आणि त्याच क्षणी त्या आईच्या पोटातील बाळ घाबरून पोटात उसळी मारते. गर्भावस्थेत मुल आपल्या आई वडिलांच्या भावनांमध्ये एवढे गुंतलेले असू शकते, ते त्यांच्या विचारांचा परिणाम स्वतःवर करून घेते हे सर्व अचंबित करणारे होते.


     या प्रसंगाचे वर्णन करताना संशोधकांनी पुढील उदगार काढले "तुमच्या पोटातील मूल हे रेल्वेच्या डब्यांमध्ये बसलेल्या एखाद्या तिऱ्हाईत प्रवाशासारखे नसून ते तुमच्याशी एकरुप झालेले जीवन आहे."


    


No comments:

Post a Comment

Monsoon Pregnancy Care: Complete Ayurvedic Guide for Healthy Moms

Monsoon Pregnancy Care: Complete Ayurvedic Guide for Healthy Moms Introduction The arrival of the monsoon brings refreshing rains, cooler we...