
गर्भारपणात कॅल्शियमप्रमाणेच लोहाचीही (आयर्न) अधिक आवश्यकता असते. लोहावर शरीरातील महत्वपूर्ण रक्तधातू अवलंबून असतो. रक्तधातू पुरेशा प्रमाणात नसला तर स्त्रीला गर्भारपणात अशक्तता, छातीत धडधडणे, थोडयाही कामाने थकवा, निस्तेजपणा वगैरे त्रास होतात. गर्भाचाही परिपूर्ण विकास होत नाही. व मूल जन्मतः अशक्त व कमी वजनाचे होण्याची शक्यता असते आणि प्रसूत होतांनाही विविध समस्या उदभवू शकतात. लोहासाठी पालक, मेथी, माठ, चाकवत, चवळी यासारख्या ताज्या पालेभाज्या आहारात रोज असाव्यात. लोहतत्वाच्या संपूर्ण चयापचयाकरिता 'क' जीवनसत्वाची आवश्यकता असल्याने पालेभाज्या खातांना वर थोडेसे लिंबू पिळावे, शिवाय आहारात काळया मनुका, काळे खजूर, बीट, डाळींब, सफरचंद, आवळा, केशर इत्यादीचा समावेश असावा. अन्न शिजवतांना थोडया गुळाचा वापर करण्यानेही लोह मिळण्यास चांगली मदत होते.
अन्न असो वा औषध, ते नैसर्गिक व शुध्द असेल तरच अंगी लागते. शरीराकडून स्वीकारले जाते आणि पर्यायाने आपले काम करण्यास सक्षम ठरते. उदा. मोसंबीचा ताजा रस घेतल्याने मिळणारे समाधान आणि फायदा, मोसंबीचा फ्लेवर टाकून तयार केलेले सरबत पिण्यापेक्षा अनेक पटींनी अधिक असते. हे आपण सर्वच जाणतो. लोह, कॅल्शियमच्या बाबतीतही तेच आहे. प्रयोगशाळेत रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणाने तयार केलेले लोह किंवा कॅल्शियम शरीरात गेल्यानंतर स्वीकारले जाईलच असे नाही. अनेकांना लोहाच्या गोळयांनी मलावष्टंभ होतो तो यामुळेच. शिवाय अशा अनैसर्गिक पध्दतीने तयार केलेल्या गोळयांमुळे शरीरात उष्णता वाढू शकते. ज्याचा परिणाम गर्भवती व बाळ या दोघांवर होतो. म्हणूनच आहारातून कॅल्शियम व लोह मिळविता येईल तेवढे चांगले. कारण ते नैसर्गिक असल्याने व्यवस्थित पचू शकते आणि त्याचे शोषणही योग्य प्रकारे होऊ शकते.
आर्युवेदात अशी अनेक प्रभावी औषधे आहेत की, ज्यांचा उपयोग लोह व कॅल्शियम वाढविण्यासाठी होतो आणि त्यांचा अशा प्रकारचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. रक्तधातूंचे पोषण झाले की, एकंदर आरोग्याबरोबरच तेजस्वी अंगकांतीचा लाभ होतो. अशा प्रकारचे लोह व कॅल्शियम व्यवस्थित घेतल्याने बाळंतपणानंतर सहसा दिसणा-या केस गळणे, कंबर दुखणे, हाडांची ताकत कमी होणे वगैरे तक्रारीना प्रतिबंध होतो.
सकाळ व संध्याकाळच्या जेवणात एक वाटी तरी आमटी व साधे वरण असायलाच पाहिजे. मूग आणि तूर या दोन्ही डाळी रोजच्या वापरासाठी उत्तम कारण त्या पचावयास सोप्या, शरीरपोषक व बहूधा सर्व प्रकृतींना अनुकूल असतात. एकंदर शरीरशक्तीसाठी प्रोटिन्सची आवश्यकता असते आणि गर्भारपणात तर ही आवश्यकता अधिकच असते. कारण गर्भाचे संपूर्ण अस्तित्व त्याच्या शरीराची घडण प्रथिनांवरच अवलंबून असते. मुगाची उसळ तर उत्तमच असते पण चवळी, मटकी, मसुर व कुळथाची उसळही कधीतरी खाण्यास हरकत नाही. रोजच्या जेवणात एक वेळेला (शक्य तो दुपारी) मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीचा थोडया फार प्रमाणात समावेश करावा. महत्वाची गोष्ट म्हणजे मोड आलेली कडधान्य वाफवून व शिजवूनच वापरावी. आजकाल चूकीच्या प्रचारामुळे लोक मोड आलेली कडधान्ये कच्चीच सॅलडच्या रुपात किंवा जास्त प्रमाणात खाताना दिसतात. परंतू अशी कच्ची कडधान्ये पचायला दुष्कर असतात व यांच्या अतिरिक्त सेवनामुळे पचनावर वाईट परिणाम होतो. प्रोटिन्स हवेत या नावाखाली मांसाहार, सोयाबीन किंवा जड व कच्ची कडधान्ये खाल्ली तरी ती जोपर्यत पचत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग होत नाहीच. त्यामुळे पचायला सोप्या व आपल्या प्रकृतीला अनुकूल असणा-या गोष्टीतूनच प्रोटिन्स मिळविणे इष्ट होय. गर्भवतीच्या जेवणात भाज्या, फळे, धान्ये, डाळी, कडधान्ये वगैरे सगळया घटकांचा योग्य प्रमाणात व योग्य स्वरुपात समावेश व्हायला हवा.
दुधी हृदयाला पोषक पित्त कफ दोषांना संतुलित करणारी, वीर्यवर्धक, रुचकर, सातही धातूंना पोषक असल्यामुळे पथ्यकारक आहे.पालकामध्ये लोह भरपूर असते. शिवाय गर्भस्त्राव होऊ नये यासाठीही पालक उपयोगी असतो म्हणून पालकाचे सूप, भाजी आहारात ठेवावी. कोथिंबीर, ओले खोबरे, लिंबू, पुदिना, आले, हिरव्या मिरच्या, जिरे यांची हिरवी चटणी आहारात ठेवणे चांगले, याने पचन सुधारते. गरोदरपणात अन्नावरची वासना कमी झालेली असतांना अशी चटणी जेवणात असली की तोंडाला चव येते. भाज्या आणि निरनिराळी सूप बनवितांना मिरचीच्या अति वापराऐवजी आल्याचा वापर करणे अधिक चांगले. तुपाचे फोडणी देऊन केलेले पदार्थ गर्भवतीला देता आले तर अधिक चांगले.
गर्भारपणात रोज एखादे ताजे, त्या ऋतूत तयार होणारे फळ खाणेही आवश्यक आहे. मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्ताचे पोषण होते तसेच पोट साफ रहायला मदत होते. शहाळयाचे ताजे पाणी गर्भारपणात नियमित घेणेदेखील चांगले त्यामुळे वरील फायदे मिळतात. शिवाय गर्भोदकाचे (गर्भाशयातील द्रव - अम्निऑटिक फ्लुईड ) प्रमाण योग्य राहण्यास मदत मिळते.शहाळ्यातील कोवळे खोबरे (मलाई) शक्तिवर्धक, पचायला हलकी तसेच पित्त कमी करणारी असते. त्यामुळे शहाळ्यातील मलई गर्भवतीने अवश्य खावी. एकंदर नारळ व शहाळे मांसधातूला पोषक असल्याने गर्भाच्या पोषणाला हातभार लावते व मांसधातूपासून तयार होणा-या त्वचेला सतेज व निरोगी ठेवण्यास मदत करते. किसलेले ओले किंवा सुके खोबरे यांचाही पूर्वी सांगितल्याप्रमाणे भाजी, आमटी, चटणीत वापर करावा.
कोकम सरबताचाही प्रकृतीनुरुप वापर केलेला चांगला. कोकम सरबतामध्ये जिरेपूड, थोडीशी मिरी पूड, साखर व काळे मीठ टाकून घेतल्याने पित्त तर कमी होतेच पण पचन सुधारण्यासही उपयोग होतो. गर्भवतीने मूळीच खाऊ नये ती पपई. पपईमध्ये गर्भाशयाचा संकोच करण्याचा गुणधर्म असल्यामुळे पपई खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो. तसेच कोरफड घेऊ नये.
मिल्कशेक हा प्रकार सध्या फार प्रचलित आहे. मात्र दूध व फळे एकत्र करुन खाणे आर्युवेदाने चुकीचे सांगितले असल्याने गर्भारपणात याचे सेवन न करणेच चांगले. आजकाल जन्मतःच अॅलर्जी, त्वचेचे रोग, कमकुवत फुफुसे वगैरे त्रास आढळतात. त्यामागे फूटसॅलेड मिल्कशेक हे एक कारण असू शकते.
केशर स्निग्ध व उष्ण असून रक्तधातु वाढविणारे आणि रक्तशुध्दी करणारेही आहे. गर्भारपणात केशर नियमित घेतल्याने गर्भाच्या हृदयाला बल मिळते, कांती सतेज होते शिवाय बाळंतपणाच्या कळा नीट यायला मदत होते. खडीसाखर शीतल, पित्तशामक व पौष्टिक असते. व स्वरही सुधारते. गर्भारपणात शक्यतो उपवास करुच नये. अगदीच आवश्यक असल्यास पचायला सोपे असलेले राजगिरा, बटाटा, भगर किंवा साबुदाण्याची खीर खावी.
गर्भवतीने आहारात कोणत्याही प्रकारचे जड पदार्थ टाळावेत. चीज पचायला अत्यंत जड असल्याने फायदयापेक्षा नुकसानच जास्त करते. आर्युवेदाने अंडे आम वाढविणारे, पचायला फार जड आणि शरीरात सामावण्यात अतिशय अवघड सांगितलेले आहे. गर्भारपणात अंडे खाल्यास बाळाला जन्मताःच त्वचेच्या अॅलर्जी, पुरळ वगैरेंचा त्रास होण्याचा संभव बळावतो. त्यामुळे अंडे गर्भारपणात निषिध्द समजावे.
No comments:
Post a Comment